साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त 'बसप'ची बैठक
◾निळा,पिवळा,हिरवा रंग एकत्र आणणार-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे,( राज्य रिपोर्टर न्युज ) : समाजाच्या व्यथा-व्यंगांना शब्दांनी जखमांसारखे भिडवणारे क्रांतीचे कवि, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून उसळणारा विद्रोह हा दलितांच्या आशा-आकांक्षांचा तेजस्वी सूर्य ठरला. लेखणीतून समाजात क्रांती आणणारे लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या जयंती निमित्त १ ऑगस्ट रोजी बहुजन समाज पक्षाच्यावतीने त्यांच्या मुळ गावी वाटेगाव (सांगली) येथे जयंती सोहळा आयोजन करण्यात आला आहे. यानिमित्त बुधवारी (ता.२३) पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बळकटीसह बहुजन मतदारांना एकत्र आणण्यावर भर देण्यात आला.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सेक्टर, बूथ पातळीवर संघटन बळकटीकरणासाठी काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अॅड.सुनील डोंगरे यांनी केले.बहुजनांना एकत्रित आणण्यासाठी घरोघरी पक्षाचा विचार पोहचणे आवश्यक आहे. वंचित,पीडित,शोषितांना बसपाच्या निळ्याझेंड्याखाली आणून न्याय देण्याचे काम बसपाच्या प्रत्येक कॅडरला करायचे आहे.बसपा हा पक्ष महापुरुषांच्या विचारांवर चालणारा असून, समाज परिवर्तनासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन बैठकीतून अॅड.डोंगरे यांनी केले.
निळा,पिवळा आणि हिरव्या रंग अर्थात विविध बहुजन घटकांना एकत्रित आणले तर पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत १००% यश निश्चित आहे, असा विश्वास प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला.शासनकर्ती जमात होण्यासाठी विविध वंचित घटकांना एकत्रित आणणे आवश्यक आहे. हे कार्य हाती घेवू, असे डॉ.चलवादी म्हणाले.
१३ जुलै रोजी लखनऊ येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत मा.सुश्री बहन मायावती जी यांनी रामचंद्र जाधव यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी पदी नियुक्ती केली. यानिमित्त मा.जाधव यांचा पुणे जिल्ह्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. २६ जुलै रोजी कोल्हापूरात बसपने सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा केला होता. येत्या २४ सप्टेंबर २०२५ रोजी 'पुणे करार धिक्कार दिवस' पाळण्याचा निर्णय देखील बैठकीतून घेण्यात आल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी अॅड.संजीव सदाफुले, अप्पासाहेब लोकरे, दादाराव उईके, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह जिल्हा प्रभारी, जिल्हा कमिटी सदस्य, विधानसभा अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.
0 Comments