सर्वसमावेशक विकास साधणारा, राज्याला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प - हंसराज अहीर

 




सर्वसमावेशक विकास साधणारा, राज्याला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प - हंसराज अहीर

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शिंदे-फडणवीस सरकारने विधीमंडळात सादर केलेला व अर्थमंत्री म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला सन 2023-24 चा अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असुन तो पंचामृत ध्येयावर आधारित असल्याने शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, ओबींसीसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास साधणारा सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित व महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी या अर्थसंकल्पावर व्यक्त केली आहे.

या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये भरण्याचा महत्वाकांक्षी निर्णय, केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ, धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी 1 हजार कोटी, महामंडळामार्फत 10 हजार कोटी बिनव्याजी कर्ज, इतर मागासवर्गीयांसाठी येत्या 3 वर्षात 10 लाख घरे, 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविणार, लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींच्या जन्मानंतर 5000, पहीलीत 4000, सहावीत 6000, अकरावीत 8000 व अठरा वर्षानंतर 75 हजार सरकार देणार, अंगणवाडी सेविका मानधन 10 हजार रुपये मदतनिस 5 हजार 500 रुपये, आशा स्वयंसेविकाच्या मानधनात 3500 वरुन 5000 रुपये वाढ, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य अंतर्गत 5 लाखापर्यंत उपचाराची सोय, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार लाभार्थ्यांना 1 हजारावरुन 1500 रुपये वाढ केली, महिलांना एस टी प्रवासात 50 टक्के सुट, ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरांमध्ये विरंगुळा केंदाची स्थापना, आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्यामध्ये रस्त्यांसाठी 400 कोटीच्या तरतूदीने हा समाज विकासाकडे वाटचाल करेल. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ, वर्ग 5 वी ते 7 वी 1 हजार वरुन 5 हजार, 8 वी ते 10 वी 1500 वरुन 7500 याचबरोबर शिक्षणसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपयांची भरघोस वाढ, राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम तसेच बालेवाडी पुणे येथे मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खेळाडुकरिता स्पोर्ट सायन्स सेंटरची उभारणी, अल्पसंख्यक महिलांसाठी 3 हजार बचत गट व कौशल्य विकास प्रशिक्षण व अन्य विविध क्षेत्रात विकास साधण्याची भुमिका अर्थसंकल्पातून पार पाडली आहे. सामाजिक, आरोग्य तसेच किडा क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणारा निर्णय अर्थमंत्र्यांनी संतुलित व सर्वसमावेशी अर्थसंकल्पातून घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफिचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मच्छीमारांना 5 लाखाचा विमा, शेतकऱ्यांना शेततळी व मागेल त्याला शेडनेट हरितगृह यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा व रोजगार निर्मिती, रोजगारक्षम युवा, पर्यावरण पुरक विकास साधणारा हा अर्थसंकल्प असुन महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीला साजेसा असा हा अर्थसंकल्प असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.



Post a Comment

0 Comments