मोटारसायकल चोराला अटक, गुन्हा नोंद नसलेल्या चोरीच्या 3 मोटारसायकल जप्त - स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
◾विविध गुन्हे उघडकीस - गुन्हा नोंद नसलेल्या चोरीच्या 3 मोटारसायकल जप्त
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर डॉ. खान ह्यांच्या दवाखान्याजवळ उभी असलेली आपली MH 34 AY 2670 ह्या क्रमांकाची पॅशन प्रो मोटारसायकल दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी चोरीला गेल्याची तक्रार पंचशील नगर, तुकुम, चंद्रपूर येथिल रहिवासी असलेल्या मिलिंद भरत वाघमारे ह्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने रामनगर पोलिसांनी अप.क्र. 839/21 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी रामनगर परिसरातून दुसरी मोटारसायकल देखिल चोरीला गेल्याची घटना घडली. एकाच दिवशी झालेल्या मोटारसायकलच्या दोन चोरीच्या घटनांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ह्यांनी आपल्या पथकाला शहरात गस्त वाढवून त्याचप्रमाणे सीसीटीव्ही रेकॉर्डींग तपासुन तसेच संशयित गुन्हेगारांची चौकशी करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत निर्देश दिलेले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यानुसार कारवाई करून गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार राजु उर्फ राजकुमार बालाजी धुवे, वर्य 28 वर्षे, रा. अर्जुनी चारगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर हा वरील गुन्ह्यात चोरी केलेली मोटारसायकल घेऊन चंद्रपूर शहरात फिरत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने नाकाबंदी करून आरोपीस जटपुरा गेट परिसरात मोटारसायकलसह पकडले.
सदर मोटारसायकलची पाहणी केली असता ती MH 34 AY 2670 ह्या क्रमांकाची असल्याचे स्पष्ट झाले व ती वरील गुन्यात चोरी गेलेली असल्याची खात्री झाली. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्याची कबुली देऊन आणखी 8 मोटारसायकल चोरल्याचे कबुल केले. प्राप्त माहितीनुसार व आरोपीने केलेल्या खुलाशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या ताब्यातील 4,50,000 रुपये एकत्रित किमतीच्या एकुण 9 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असुन आरोपीकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1) रामनगर पोलीस ठाणे अप.क्र. 838/21 कलम 379 भा. दं वि.2) रामनगर पोलीस ठाणे अप.क्र. 839/21 कलम 379 भा. दं वि.3) वरोरा पोलीस ठाणे अप.क्र. 692/21 कलम 379 भा. दं वि.4) वणी पोलीस ठाणे, जि. यवतमाळ अप.क्र. 705/21 कलम 379 भा. दं वि.5) वणी पोलीस ठाणे, जि. यवतमाळ अप.क्र. 707/21 कलम 379 भा. दं वि.6) वणी पोलीस ठाणे, जि. यवतमाळ अप.क्र. 708/21 कलम 379 भा. दं वि. ह्या गुन्ह्यांचा भांडाफोड करण्यात आला त्याचप्रमाणे इतर तीन मोटारसायकल 1) हिरो स्प्लेंडर प्रो. क्र. MH 40 AV 8607, 2) हिरो स्प्लेंडर क्र. MH 04 B16 F 27471 3) बजाज पल्सर क्र. MH 49 V 3325 ह्या गुन्हा दाखल नसलेल्या मात्र चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स.फौ.राजेंद्र खनके, ना.पो. शि. दीपक डोंगरे, पो. शि. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे यांनी केली आहे.
0 Comments