ग्रेडर्सची नियुक्ती करून कापूस खरेदीची क्षमता वाढवा : खासदार बाळू धानोरकर
कोविड १९, रेती महसूल, कृउबास सह अनेक विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस खरेदी करीता अद्यापही ग्रेडर्सच्या नियुक्त्या न झाल्यामुळे कापूस खरेदी व्यवस्थितरीत्या होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या ठिकाणी ग्रेडर्सची नियुक्ती करून कापूस खरेदीची क्षमता वाढविण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे. यासह कोविड १९, रेतीचा महसूल वाढविणे, कृउबास भद्रावतीसह अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी कॉग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय, रामू तिवारी, बसंत सिंग यांची उपस्थिती होती.
सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस घरात पडून आहे. पावसाळा सुरु होण्यास काही दिवसचं शिल्लक राहिलेला असून शेतकरी संकटात सापडलेला आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. यात अक्षम्य दुर्लक्ष होत असून तात्काळ ग्रेडर्सच्या नियुक्त्या होणे आवश्यक आहे. सी. सी. आय व फेडरेशन मार्फत १५ जून पूर्वी कापूस खरेदी शक्य न झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याकरिता ग्रेडर्सची नियुक्ती काढून कापूस खरेदी करण्याची क्षमता वाढविण्याची मागणी त्यांनी केली. यासह भद्रावती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती साठी जागेकरिता कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मुंबई, याना पत्र देणे, कोरोना कंटेन्टमेंट झोन मधील व्यवस्था, रेतीच्या चोरट्या अवैध वाहतुकीमुळे जो शासनाचा महसूल बुडत आहे. वाढविण्याच्या दृष्टीने चोरीची रेती सापडली असल्यास त्याच्या तात्काळ लिलाव करणे इत्यादी बाबत सूचना देण्यात आल्या.



0 Comments