चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुका येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १८० विद्यार्थी प्रवेश क्षमतेला मंजुरी - आ. श्री. सुधीर मुनगंटीवा
◾शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन
◾इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स विद्याशाखांमध्ये घेता येणार शिक्षण
◾जनतेला दिलेला शब्द आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला पूर्ण
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून आगामी शैक्षणिक वर्षापासून मुल येथे सुरू होत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला १८० विद्यार्थी क्षमतेसाठी राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे शक्य होऊ शकले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मुल येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू होत आहे. शासन निर्णयानुसार शासकीय तंत्रनिकेतन, मुल, जिल्हा चंद्रपूर हे सुरुवातीच्या टप्प्यात नगरपरिषदेच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सुरू होईल. याठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकॉम्युनिकेशन इंजिनिअरींग आणि कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरींग या तीन विद्याशाखांमध्ये एकूण १८० प्रवेश क्षमतेसह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सदर संस्थेसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे मान्यतेसाठी अर्ज करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा व विशेषतः मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
दीर्घकालीन दृष्टीने हे शासकीय तंत्रनिकेतन मुल येथील गट क्रमांक ८०२, ८०३ व ८०४ मधील सुमारे १.६० हेक्टर म्हणजेच अंदाजे चार एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात येणार आहे. या जमिनीवर होणाऱ्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नकाशांना मान्यता घेऊन आवश्यक बांधकामाची कार्यवाही वेगाने सुरू करण्यात येणार आहे. तोपर्यंत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून नगरपरिषद मुल अंतर्गत असलेल्या उपलब्ध इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अध्यापन सुरू होणार आहे.
मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच सुमारे १७३.९१८ कोटी रुपयांच्या खर्चासह राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. या अंतर्गत टप्प्याटप्प्याने ३९ शिक्षकीय व ४२ शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली असून आवर्ती व अनावर्ती खर्चालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुल येथील जनतेला दिलेला शब्द आमदार श्री. मुनगंटीवार यांनी या निर्णयातून पूर्ण केला असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या निर्णयाबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणारा हा निर्णय ठरेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
मनुष्यबळ निर्माणाची प्रक्रिया सुलभ
चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक विस्ताराला वेग मिळत असून सुरजागड इस्पात प्रा. लि.सह विविध उद्योग प्रकल्प उभारणीच्या मार्गावर आहेत. खनिकर्म, वीज निर्मिती, लोहनिर्मिती, ऑटोमेशन आणि बांधकाम क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता स्थानिक युवकांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने हे शासकीय तंत्रनिकेतन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेर न जाता गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण मिळण्याचा मार्ग या निर्णयामुळे खुला झाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील विकास
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सैनिकी शाळा,मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज,महिला सक्षमीकरण केंद्र, कृषी व अभियांत्रिकी शिक्षण संस्था, गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास मिळालेली मान्यता ही त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानली जात आहे.






0 Comments