रोजगार व स्वयं रोजगार कार्यशाळेतून बेरोजगार युवकांना मार्गदर्शन संघर्ष युवा विकास मंडळ, साखरीचा स्तुत्य उपक्रम
राजुरा,( राज्य रिपोर्टर न्युज ) : कोळसा खाण क्षेत्रातील भुमिहीन बरोजगार युवक व व्यावसायीक शिक्षण घेतलेल्या युवकांच्या रोजगार व स्वयं रोजगाराकरिता तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित करून अशा युवक-युवतींना योग्य दिशा देण्याच्या उद्देशातून साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाद्वारे पुढाकार घेत दि. 25 जानेवारी रोजी स्वयं रोजगार, गृह व लघु उद्योग कार्यशाळा आयोजित केली होती.
सदर कार्यशाळेच्या व्यासपीठावर संघर्ष युवा विकास मंडळाचे अध्यक्ष राजु घरोटे, सरपंच प्रणालीताई मडावी, ज्येष्ठ नागरीक रामचंद्र लांडे, राजुराचे रूपेश भाकरे, कैलास कारलेकर, बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा संगीताताई आत्राम आदींची उपस्थिती होती.
साखरी (वाघोबा) येथील जि.प. शाळेमध्ये आयोजित हा कार्यक्रम मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आला. सदर कार्यशाळेस पुणे येथील दत्तात्रयजी आंबुलकर व्यवस्थापन सल्लागार, सिपेट चंद्रपूरचे प्लेसमेंट अधिकारी पुष्कर देशमुख व सिसकॉन इज्युमेंट फाऊंडेशन चंद्रपूरचे संजय दाणेकर यांचेद्वारा रोजगार व स्वयं रोजगाराविषयक अत्यंत उपयुक्त माहिती उपस्थितांना देण्यात आली.
आपल्या मार्गदर्शनात श्री. आंबुलकर यांनी विविध व्यवसाय अत्यंत कमी भांडवलात सुरू करून कल्पकतेने व्यवसायात मोठी झेप घेणे शक्य असल्याचे सांगितले. तत्कालीन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून स्थापित झालेल्या सिपेट केंद्रातून अनेक जिल्ह्यामधील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयं रोजगाराच्या मोठ्या संधी लाभल्या व 7 हजाराहून अधिक युवक-युवतींना रोजगार व स्वयं रोजगाराच्या संधी मिळाल्या. त्यामुळे या कार्यशाळेत सहभागी झालेल्या युवकांनी सिपेटच्या माध्यमातून रोजगार व स्वयं रोजगाराच्या अधिकाधिक युवकांना संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे आवाहन सिपेट केंद्राचे प्लेसमेंट अधिकारी पुष्कर देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
मंडळाचे सचिव अॅड. प्रशांत घरोटे यांनी आपल्या प्रस्ताविकातून मंडळाच्या 25 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आलेख मांडत मंडळाने युवकांना शिक्षण, क्रीडा तसेच विविध कलागुणांना प्रोत्साहन मिळेल असे कार्यक्रम सातत्याने राबविले असून मंडळाद्वारे यापूढे रोजगार व स्वयं रोजगार विषयक उपलब्धी करीता प्रयत्न करण्यात येत असून ही कार्यशाळा याच प्रयत्नाचा एक भाग असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेला युवक-युवतींबरोबरच बचतगट महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अमोल देरकर व आभार प्रदर्शन सुदर्शन बोबडे यांनी केले.







0 Comments