65 वर्षीय वृद्ध महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची कारावासाची कठोर शिक्षा
◾आरोपी अयुब खान साहेब खान पठाण रा. गडचिरोली
◾सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाचे अभियोक्ता ॲड. एस. आर. डेगावार यांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरात घडलेल्या वृद्ध महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणात चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस कठोर शिक्षा सुनावत पाच वर्षांच्या सक्तमंजुरीसह दंड ठोठावला आहे. या निकालामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला आहे.
7 जुलै 2024 रोजी महाकाली मंदिर परिसरात 65 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्याचा घृणास्पद प्रकार घडला होता. आरोपी अयुब खान साहेब खान पठाण रा. गडचिरोली याच्या विरोधात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्र. 755/2024 भा.न्या.सं. 2023 मधील कलम 74,75, (i)(ii), 76 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गंभीर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. तृप्ती खंडाईत यांनी काटेकोरपणे पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, अभिश्री देव यांनी आरोपीस दोषी ठरवत भा. न्या. सं. कलम 64 (2)(के) सह कलम 62 अंतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी व 5 हजार रुपयांचा दंड, तसेच कलम 258 (2) नुसार सहा महिन्यांची सक्तमजुरीची अतिरिक्त शिक्षा सुनावली.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाचे अभियोक्ता ॲड. एस. आर. डेगावार यांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. पोहवा /2370 किशोरी यांनी पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
या निकालामुळे समाजातील दुर्बल घटकांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत, असा ठाम संदेश मिळाल्याचे कायदा तज्ञांनी नमूद केले आहे.






0 Comments