दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा!
◾बसप महासचिव डॉ.हुलगेश चलवादींची मागणी
◾दोषींवर गुन्हा दाखल केला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा
पुणे,( राज्य रिपोर्टर न्युज ) : विद्येचे माहेरघर असलेल्या 'सावित्रीमाईं'च्या पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच मानसिक,शारिरिक त्रास मिळत असेल तर पीडितांनी कुणाकडे दाद मागायची? असा सवाल बहुजन समाज पक्षाने उपस्थित केला आहे. सध्या गाजत असलेले 'कोथरूड पोलीस स्टेशन' प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. पीडित तरुणींना मारहाण करीत जातीवाचक शब्द वापरणाऱ्या पोलिसांवर अॅक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बसपचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी,माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.४) केली. दोषींवर गुन्हा दाखल केला नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील डॉ.चलवादींनी दिला.
पोलीस कोठडीत झालेला सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. हे प्रकरण पोलीस यंत्रणेच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण करणारे आहे. असे असतांना कोथरूड पोलीस स्टेशन आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर तरुणींकडून आरोप होत असतील तर ही बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पोलिसांकडून कुठलेही वॉरंट नसतांना तरुणींच्या घरात प्रवेश करणे, त्यांच्या बेडरूमसह बाथरूमची तपासणी करणे तसेच त्यांच्यासोबत खालच्या स्तरावर बोलणे असे प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडत असतील तर बसपा गप्प बसणार नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणात तात्काळ कारवाई करीत दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली.
पीडितांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची सखोल चौकशी करीत दोषींवर अॅक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बसपने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३ वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांनी कुठलीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण,लैंगिक अपमान केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. राज्य महिला आयोगाने देखील याप्रकरणाची दखल घेत तात्काळ कारवाईचे निर्देश द्यावे, अशी मागणी डॉ.चलवादींनी केली आहे.
0 Comments