महिलांच्या आधार कार्डवर वडिलांचे आणि पतीचे दोन्ही नावे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करावी - खासदार प्रतिभा धानोरकर
◾लग्नानंतर महिलांना त्यांच्या माहेरचे आडनाव सोडून पतीचे आडनाव लावावे लागते.
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : शासकीय आणि निमशासकीय कामकाजात महिलांना विवाहानंतर आधार कार्डवरील नावातील बदलामुळे अनेक वेळा अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागते. यामध्ये वेळ, पैसा आणि कायदेशीर गुंतागुंत यांचा समावेश होतो. ही अडचण दूर करण्यासाठी महिलांच्या आधार कार्डवर लग्नापूर्वीचे (वडिलांचे) आणि लग्नानंतरचे (पतीचे) दोन्ही नावे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, खासदार प्रतिभा धानोरकर लोकहितकारी मागणी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे भेट घेऊन करण्यात आली.
खासदार प्रतिभा धानोरकर सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार आधार कार्डावर केवळ एकच नाव नोंदवता येते. परिणामी, महिलांना लग्नानंतर वडिलांचे आडनाव सोडून पतीचे आडनाव लावावे लागते. या बदलामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांपासून ते मालमत्तेच्या कागदपत्रांपर्यंत अनेक दस्तऐवजांमधील नावाशी विसंगती निर्माण होते, ज्यामुळे सरकारी तसेच खासगी कामकाजात अडचणींना सामोरे जावे लागते.
अनेक महिलांचे शैक्षणिक दस्तऐवज, बँक खाती आणि अन्य कागदपत्रे लग्नापूर्वीच्या नावावर असतात. त्याच वेळी काही महिलांना सांस्कृतिक आणि भावनिक कारणांमुळे वडिलांचे आडनाव कायम ठेवण्याची इच्छा असते. परंतु, आधार कार्डवर ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांच्या ओळखीचा एक भाग सोडावा लागतो.
यावेळी मंत्री अश्विनी वैष्णव त्यांच्याशी संवाद साधत असताना खासदार प्रतिभा धानोरकर पॅन कार्डचे उदाहरण दिले, जिथे वडिलांचे व पतीचे दोन्ही नावे नमूद करण्याची सोय आहे. त्यामुळे महिलांची जुनी आणि नवीन दोन्ही ओळख सुरक्षित राहते. अशाच प्रकारे आधार कार्डवरही ही सुविधा लागू केल्यास, महिलांना त्यांची ओळख टिकवण्याचा हक्क मिळेल, सर्व कागदपत्रांमध्ये सुसंगती राहील आणि प्रशासकीय अडथळे कमी होतील, असे खासदार प्रतिभा धानोरकर पत्रात नमूद केले आहे.
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने आवश्यक निर्णय घेण्याची ग्वाही दिली असून, लवकरच या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा आहे.
0 Comments