कोल वॉश नंतरचा चांगला कोळसा ‘रिजेक्ट’ म्हणून विकला जातोय - आ. किशोर जोरगेवार
◾विधानसभेत मांडला मुद्दा, 13 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
मुंबई,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाजेनकोच्या वॉशरीजद्वारे ‘कोल वॉश’ प्रक्रियेनंतर तयार होणारा चांगल्या दर्जाचा कोळसा जाणीवपूर्वक ‘रिजेक्ट कोल’ म्हणून दर्शवून खुल्या बाजारात विकला जात असल्याचा गंभीर आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. हा मोठा भ्रष्टाचार असुन याची चौकशी करण्याची मागणी यावेळी औचित्याच्या मुद्दयावर बोलतांना त्यांनी अधिवेशनात केली आहे.
वेकोलि, एमसीएल, एसईसीएल, एमईसीएल आणि एससीसीएल या कंपन्यांच्या खाणींमधून दरवर्षी 13 कोटी 78 लाख टनांपेक्षा अधिक कोळसा काढला जातो. महाजेनकोने यातील कोळशाची गुणवत्ता वाढवण्यासाठी खासगी वॉशरीजना कोळसा धुण्याचे कंत्राट दिले असून, वॉशरीजमधून तयार होणार्या कोळशाची वाहतूक करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाकडे देण्यात आली आहे. मात्र, वॉशरीजकडून तयार होणारा उच्च दर्जाचा कोळसा ‘रिजेक्ट कोल’ म्हणून नोंदवला जातो आणि त्याची किंमत कमी दाखवून तो खुल्या बाजारात विकला जात आहे. एकूण 2 कोटी 75 लाख 76 हजार टन कोळसा अशा पद्धतीने खासगी कंपन्यांना विकण्यात आल्याचे समोर आले असून, त्याचा बाजारभाव सरासरी 5 हजार रुपये प्रति टन आहे. त्यामुळे एकूण गैरव्यवहाराची रक्कम 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी बोलतांना म्हटले आहे.
या प्रकारामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसत असून हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा कोळसा घोटाळा असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात असा गैरव्यवहार टाळण्यासाठी कोल वॉशरीज थेट विद्युत प्रकल्पांच्या परिसरातच स्थापन कराव्यात, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलतांना केली आहे.
0 Comments