बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाढीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावले
◾बल्लारशाह रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी
◾आ. मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवेदन देत वेधले लक्ष
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्याचे माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांची मुंबई येथे भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलीस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सदस्य रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती मध्य रेल्वे मुंबईचे श्री. अजय दुबे यांनी या संदर्भात आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार श्री. मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन संबंधित निवेदन त्यांच्याकडे सादर केले.
दिलेल्या निवेदनात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, येथे दररोज सुमारे ३,००० हून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सध्या येथे केवळ जीआरपीची आऊट पोस्ट कार्यरत असून तिची कार्यक्षमता अत्यंत मर्यादित आहे. या स्थानकासाठी जवळचे कार्यरत जीआरपी पोलीस स्टेशन वर्धा येथे असून, ते बल्लारशाह रेल्वे स्थानकापासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर आहे. वर्धा येथील जीआरपी स्टेशनचे कार्यक्षेत्र राजुरा आणि यवतमाळपर्यंत पसरले असून, या कार्यक्षेत्रात एकूण १९ रेल्वे स्थानके समाविष्ट आहेत.
बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे दरवर्षी काही गंभीर घटना घडत असून, चोरी, मारामारी तसेच महिलांशी संबंधित तक्रारींची मोठ्या संख्येने नोंद होते. रेल्वे पोलिस स्टेशन जवळ नसल्यामुळे काही वेळा तात्काळ मदत मिळण्यात अडथळा निर्माण होतो, तपास प्रक्रियेवर परिणाम होतो आणि प्रवाशांची आवश्यक ती सुरक्षा व सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रवासी संख्येसह कार्यरत असणाऱ्या स्टेशनसाठी स्वतंत्र रेल्वे पोलिस स्टेशनची आवश्यकता असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील जीआरपी आउट पोस्टचे स्वतंत्र पोलिस स्टेशनमध्ये रूपांतर करण्याची विनंती पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांना केली आहे.
0 Comments