चंद्रपूर जिल्ह्यातील 214 मुली व महिला बेपत्ता – आमदार जोरगेवार
◾मागील अडीच वर्षांच्या काळात 2 हजार 730 महिला व मुली बेपत्ता
◾सभागृहात उपस्थित केला गंभीर मुद्दा
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.
यावेळी मागील अडीच वर्षांची आकडेवारी सभागृहात सादर करताना दररोज सरासरी तीन मुली अथवा महिला बेपत्ता होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काहींचा शोध लागलेला असला तरी एकूण 214 महिला आणि मुली अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
याप्रसंगी ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा अपरिचित व्यक्तींशी संपर्क येत असून त्याचा गैरवापर केला जात आहे. काही लोक सोशल मीडियावरून महिलांना फसवून, त्यांच्याशी ओळख वाढवून, त्यांना चुकीच्या मार्गाने वेगवेगळ्या राज्यात पाठवून फसवत आहेत.
मागील अडीच वर्षांच्या काळात 2 हजार 730 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये 2 हजार 301 महिला आणि 439 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील अनेकांचा शोध लागला असला तरी अद्यापही 214 महिला व मुली बेपत्ता असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडले.
या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा तसेच बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी सभागृहात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
0 Comments