विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांपर्यंत पोहचवा - जिल्हाधिकारी विनय गौडा
◾सेवा हक्क दिन कार्यक्रम
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : कल्याणकारी राज्यामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध सेवा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच सदर सेवा विहित वेळेत मिळणे, हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने नियेाजन सभागृह येथे आयोजित सेवा हक्क दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपायुक्त मंगेश खवले आदी उपस्थित होते.
शासन आणि प्रशासन लोकांसाठी काम करते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, सेवा हक्क अधिनियम लागू होऊन आज दहा वर्षे पूर्ण झाली. नागरिकांना कल्याणकारी सेवा उपलब्ध करून देणे, हे शासन – प्रशासनाचे कर्तव्य आहे. या सेवा त्यांना वेळेत मिळण्यासाठी आपापल्या विभागाच्या अधिसुचित सेवा नागरिकांपर्यंत पोहचवा. लोकांना त्रास न होता सेवा मिळाल्या तर शासन-प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली.
यावेळी आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, सेवा हक्क अधिनियम सकारात्मक स्वरुपाचा कायदा आहे. सेवा किती दिवसात दिल्या पाहिजे, याचे बंधन या कायद्यात आहे. सर्व सेवा ऑनलाईन देण्याचे नियोजन आहे. चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे नागरिकांसाठी 70 सेवा अधिसुचित केल्या असून या सेवा चांगल्या पध्दतीने देण्याचा पालिकेचा मानस आहे.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार म्हणाले, प्रत्येक विभागाच्या अधिसुचित सेवा पारदर्शक पध्दतीने विहित कालावधीत मिळाव्या, हा या आयोजनामागचा उद्देश आहे. सर्व सेवांची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळणे आवश्यक आहे. वेळेत सेवा नाही दिली तर संबंधितांना 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रकल्प प्रमुख विकास लालसरे यांनी तर आभार उपायुक्त मंगेश खवले यांनी मानले. तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सेवांचे डीजीटल पध्दतीने लोकार्पण, महापालिकेच्या सेवा हक्क कायदा वेबसाईटचे उद्घाटन तसेच सिटीजन चार्टर क्यूआर कोडचे उद्घाटन करण्यात आले.
सेवादूत योजनेचा शुभारंभ : सेवादूत योजनेसाठी चंद्रपूर महानगरपालिका व नाविन्य शहर स्तर या सामाजिक संस्थेसोबत करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार 138 वॉर्ड सखींना सेवादूत म्हणुन प्रशिक्षित करण्यात आले आहे. या वॉर्ड सखी सेवा हक्क कायदा पोर्टलवर भेट देऊन घरबसल्या ऑनलाईन सेवा कशा प्राप्त करता येईल, याचे प्रशिक्षण घरोघरी जाऊन देणार आहेत.
अधिका-यांचा गौरव : महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम - 2015 च्या अनुषंगाने सन 2024-25 या वर्षात महानगरपालिका स्तरावर नागरिकांना सेवा देण्यात उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल अधिकारी – कर्मचा-यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात शहर अभियंता विजय बोरीकर, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, विधी अधिकारी अनिलकुमार घुले, प्र. सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, आस्थापना विभाग प्रमुख नरेंद्र बोबाटे, स्वच्छता विभाग प्रमुख अमोल शेळके, संगणक विभाग प्रमुख अमुल भुते आणि महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठिर रैच यांचा समावेश होता.
महसूल विभागातर्फे प्रमाणपत्राचे वाटप : सेवा हक्क दिनानिमित्त महसूल विभागातर्फे नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात तन्मय बेलगे, सुमीत भिसे, निसर्गा काटकर यांचा समावेश होता.
0 Comments