21 व्या शतकात विषारी अन्न व विषारी विचारांचे समाजापूढे आव्हान - ना.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

 




21 व्या शतकात विषारी अन्न व विषारी विचारांचे समाजापूढे आव्हान - ना.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

◾मन की बातचा शतकपूर्ती सोहळा


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : काही लोकं स्वार्थासाठी जाती जाती मध्ये विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.ज्या संतांनी समाजाच्या अखंडतेसाठी,समानतेसाठी कार्य केले,समाजाला दिशा दिली त्या संतांनाही जाती जातीमध्ये बंदिस्त केले जात आहे.ही बाब लोकशाहीला मारक आहे. 21 व्या शतकात आपल्या समोर विषारी अन्न व विषारी विचारांचे मोठे आव्हान आहे,जनतेनी जागरूकपणे वागले पाहिजे,असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ते प्रियदर्शिनी सभागृहात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणी वरील मन की बातच्या शतकपूर्ती सोहळ्यात 100 व्या भागाच्या थेट प्रसारण प्रसंगी प्रेक्षकसमुदयास मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी कामगार आघाडी अध्यक्ष सुरजसिंग आणि टीम,भाजपा इंजिनिअरिंग आघाडी अध्यक्ष सोहेल शेख यांना ना.मुनगंटीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थी परिषदच्या सचिव ऋषीकेश बुटले, काष्ठपूजन सोहळ्यातील आकर्षक रथ तयार केल्याबद्दल युवक मंडळ गंजवार्ड आणि यश बांगडे यांचा तर बंडू धोत्रे आणि इको-प्रोच्या चमुचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,भागवताचार्य मनिष महाराज व मन की बातचे संयोजक डॉ.दीपक भट्टाचार्य, यांची उपस्थिती होती.

 ना.मुनगंटीवार म्हणाले,हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे.भारताचा अमृतकाळ सुरू झाला आहे.अश्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी संवाद व त्यातून निर्माण होणारी राष्ट्रभक्ती कल्पनेपलीकडले आहे. या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर होत आहे, हे आपले सौभाग्य आहे. पंतप्रधान मोदी आता भारतापूरते मर्यादित राहिले नसून,ते विश्वव्यापी  झाले आहे. विदेशातील हिंदीची जाण असणारे लोकं मन की बात कार्यक्रम ऐकतात,हेच नाहीतर अनेक देशात हा संवाद त्यांच्या तेथील भाषेत जनतेला उपलब्ध करून दिल्या जात आहे,यातून हे सिद्ध होते,असे ते म्हणाले. देशात 720 पेक्षा जास्त जिल्हे आहेत. परंतु चंद्रपूरचा 3 वेळा उल्लेख  मन की बात मध्ये पंतप्रधान मोदींनी केला. हे सौभाग्य फक्त चंद्रपूरकरांना लाभले. यापूर्वीच्या माझ्या वनमंत्री पदाच्या कार्यकाळातील वृक्ष लागवड,मिशन शौर्य अंतर्गत चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यानी हिमालयावर फडकविलेला तिरंगा व इको-प्रोचे हेरिटेज वॉक या 3 विशेष कामगिरीचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला होता,अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मंगेश  गुलवाडे यांनी केले. भारत माता पूजन व कु.हास्स्या विघ्नेश्वर यांच्या गणेश वंदनानृत्याने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आली. डॉ. दीपक भट्टाचार्य यांनी आभार मानले,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार,प्रकाश धारणे,राहुल पावडे,अमित कासंगोट्टुवार,रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार,प्रदीप किरमे,किरण बुटले,मुग्धा खांडे,रुद्रनारायण तिवारी, गणेश रामगुंडेवार,डॉ. गोपाल मुंधडा,डॉ. सुशील मुंधडा,आशा वर्कर,डॉ. शैलेंद्र शुक्ला,अमीन शेख,छबु वैरागडे यांचे सह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

छत्रपतींची जगदंब तलवार ऊर्जा देणारे परीस

शिवरायांच्या राज्यभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. ते साजरे करताना शिवरायांची जगदंब तलवार व वाघ नखे ग्रेट ब्रिटन कडून परत आणण्याचा संकल्प केला आहे. जगदंब तलवार सोन्यासारखी ऊर्जा देणारे परीस आहे. तर वाघ नखे सळसळत्या रक्तात आणखी ऊर्जा निर्माण करेल. दोन्ही नजरेस पडतील तेव्हा आपल्या रक्तात आणखी ऊर्जा संचरेल. ग्रेट ब्रिटनने नुकताच एक कायदा केला असून दुसऱ्या देशाच्या ऊर्जा देणाऱ्या वस्तू कर्जतत्वावर देण्याची यात तरतूद आहे. त्यामुळे आता रायगडावरील 350 व्या राज्यभिषेक सोहळ्यात जगदंब तलवार व वाघनखे असणार अशी ग्वाही ना.मुनगंटीवार यांनी दिली.

पंतप्रधान मोदी ईश्वराने दिलेले वरदान

‘संविधान मेरा धर्मग्रंथ,देश मेरा परिवार है’ असे म्हणत मोदींनी, जात-पात-धर्म न बघता ‘मन की बातच्या  माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याची किमया केली. राष्ट्रभक्ती जगविणारा असा उपक्रम जगातील कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाला किंवा राष्ट्राध्यक्षाला सुचला नाही. ब्रीटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांनी तर ‘एक सूर्य, एक चंद्र, एक पृथ्वी आणि एक नेता… नरेंद्र मोदी’ या शब्दांत पंतप्रधानांचा गौरव केला आहे. ईश्वराने भारताला दिलेले वरदान म्हणजे पंतप्रधान मोदी होय, असे ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पुजनाने करावी अशी सुचना त्यांनी केली. तत्पूर्वी, महानगर भाजपच्या वतीने ना. मुनगंटीवार यांना बांबूपासून तयार केलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाकडी प्रतिमा असलेला ‘मन की बात’चा रेडियो भेट देण्यात आला. अयोध्या श्रीराम मंदिराच्या काष्‍ठपूजन व शोभायात्रेदरम्‍यान आयोजित वेशभूषा, रांगोळी यासह विविध स्‍पर्धांचे पुरस्कार वितरण यावेळी ना.मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ना.मुनगंटीवार यांची पश्चिम क्षेत्र सांस्‍कृतीक मंडळाच्‍या अध्‍यक्षपदी नियुक्‍ती झाल्‍याबद्दल अनेक संस्‍थांनी त्‍यांचा सत्‍कार केला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव व दिवाकर पुद्दटवार यांनी केले.




Post a Comment

0 Comments