धावत्या रेल्वेतून तोल जाऊन प्रवासी पडला रेल्वे हेड कॉन्स्टेबल घनश्याम शिंदे यांनी वाचवले प्रवाशाचे प्राण,वर्धा स्थानकावरील थरार !
वर्धा ( राज्य रिपोर्टर ) : काल सायंकाळी 9 वाजताच्या दरम्यान अजनी- पुणे सुपर फास्ट एक्सप्रेस वर्धा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ वर येत असताना, एक प्रवासी चालत्या रेल्वेतून खाली उतरताना प्लॅटफॉर्मवर पडला. चालत्या गाडीतून तोल जाऊन पडल्याने तो ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या कोसळला मात्र तो धावत्या ट्रेनच्या व फलाटाच्या मधे अडकण्यापूर्वीच किंवा ट्रेनखाली येण्याआधीच सदर घटना तिथेच कर्तव्यावर असलेल्या हेड कॉन्स्टेबल घनश्याम शिंदे ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब धाव घेऊन सदर इसमाला ओढले व त्यांच्या जीव वाचवला, ही घटना इतकी थरारक होती की तिथे उपस्थितांचे भंबेरी उडाली.
सविस्तर वृत्त असे की, नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर गाडी येण्यापूर्वी प्रभारी उपनिरीक्षक विनोद मोरे यांनी हेड कॉन्स्टेबल घनश्याम शिंदे यांची रेल्वे फलाटावर ड्युटी लावली होती. घनश्याम शिंदे आपले कर्तव्य बजावत असताना अजनी पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस वर्धा स्थानकावर पोहचली. मात्र ट्रेन थांबण्यापूर्वीच एक प्रवासी चालत्या ट्रेनच्या दारात उभा झाला व काही कळायच्या आत त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. मात्र तिथे कर्तव्यावर असलेल्या हेड कॉन्स्टेबल घनश्याम शिंदे ह्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन त्या इसमास ओढुन घेतल्याने पुढील अनर्थ टळला. जर शिंदे ह्यांनी तत्परता दाखविली नसती तर तो प्रवासी ट्रेन व फलाटाच्या मधे अडकून कायमचा जायबंदी होण्याची अथवा पुर्णपणे खाली घसरल्यास अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मात्र शिंदे ह्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने त्याचे प्राण वाचले. त्या प्रवाशाची विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव गौरव दुबे वय 45 वर्षे सांगितले व ते अजनी ते पुणे प्रवास करत होते. सदर व्यक्तीला जास्त दुखापत न झाल्याने पुढील प्रवाशासाठी त्याच रेल्वेत सुखरूप बसवून पुढे रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त सदर दुबे ह्यांनी वर्धा रेल्वे हेड कॉन्स्टेबल व रेल्वे पोलिसांचे आभार मानले तर इतर प्रवाशांनी त्यांच्या समयसूचकतेचे कौतुक केले.
0 Comments