कोरोना उपाययोजनांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी


कोरोना उपाययोजनांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

 चंद्रपूर(राज्य रिपोर्टर) : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणुने पाय पसरणे सुरू केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हा वार्षिक योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतींना २५ हजारांचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून हा निधी जिल्ह्यातील ८२८ ग्रामपंचायतींना मिळणार असून, १ कोटी ४ लक्ष रुपयांचा निधी वितरीत सुद्धा करण्यात आला आहे. 
जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ मधून हा निधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फ त या योजनेतील बाबींची उपयुक्तता तपासून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, निकष व अटीनुसार खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्यातील ८२८ ग्रामपंचायतींना २ कोटी ७ लक्ष रुपयांचा निधी दिला जाणार असून या निधीला प्रशासकीय मंजूरी व १ कोटी ४ लक्ष रुपयांचा निधी जिल्हाअधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी ३० जून रोजी वितरीत केला आहे. या निधीमुळे गावस्तरावर संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या नागरिकांची सोय होणार असून, कोरोनाच्या उपाययोजनांसाठी या निधीतून खर्च केला जाणार आहे. 
मागील तीन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून सुरुवातीला शहरी भागात असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही शिरला आहे. परराज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत असला तरी संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व्यक्तिांच्या सोयीसुविधांच्या खर्चावरून वाद निर्माण झाले होते. त्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून प्रत्येक ग्रामपंचायतीला कोरोना उपाययोजनांसाठी हा निधी दिला जाणार आहे. हा निधी केवळ कोरोना उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतींना खर्च करावा लागणार असून या वर्षातच तो खर्च करणे बंधनकारक राहणार आहे. यापूर्वी गाव खेड्यात कोरोनाच्या संशयित रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवल्यानंतर ग्रामपंचायतींना वेगवेगळ्या योजनांच्या निधीतून खर्च करावा लागत होता. पंरतु, आता जिल्हा वार्षिक योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा निधी मिळणार आहे.  

Post a Comment

0 Comments