पंडित दीनदयाळ उपाध्याय: एक ज्येष्ठ भारतीय विचारवंत
राज्य रिपोर्टर न्युज : ११ फेब्रुवारी ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन ! स्वतःहून आयुष्यभर ज्यांनी कधी कोणाशी वैर केले नाही, अशा दीनदयाळजींचे शरीर, ११ फेब्रुवारी १९६८ रोजी ते रेल्वे प्रवासात असताना, रेल्वे लाईन वर दुसऱ्या दिवशी पहाटे आढळले. संशयास्पद मृत्यू अशी त्याची नोंद झाली. ज्या व्यक्तीजवळ अधिकचे पैसे कधीच नव्हते, त्यांना कोणी चोराने लुटण्यासाठी मारले अशा पद्धतीचा निष्कर्ष चौकशीमध्ये निघाला आणि ती फाईल बंद झाली.
अखिल भारतीय जनसंघ या राष्ट्रीय राजकीय पक्षाचे अध्यक्ष असताना सुद्धा टोकाच्या साध्या पद्धतीने राहणाऱ्या दीनदयाळजींना पंडित ही पदवी लोकांनी स्वतः हून प्रदान केली. ते शरीराने आपल्याला सोडून गेले, तरी आजही पंडित दीनदयाळ उपाध्याय, त्यांच्या कार्याने, विचारांनी आणि एकात्म मानव दर्शन या तत्त्वज्ञानाच्या रूपाने प्रभावीपणे जिवंत आहेत. गेल्या दशकात त्यांचे एकात्म मानव दर्शन, 'राष्ट्र जीवनाची दिशा' या पुस्तकातील विचार, त्यांनी मांडलेली अंत्योदयाची संकल्पना यावर विचारवंतांमध्ये मोठे विचार मंथन सुरू आहे. काही शासकीय योजनांचे नामकरण त्यांच्या नावाने झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा हे नाव आता पोहोचले आहे. परंतु त्यांचे जीवन आणि त्यांचे कार्य मात्र फार कमी लोकांना माहित आहे.
जन्म आणि बालपण -
२५ सप्टेंबर, १९१६ रोजी सूर्योदयाच्या शुभ वेळी 'दीना' या नावाने लहानपणी घरात ओळखल्या जाणाऱ्या बालकाचा जन्म झाला. आई रामप्यारी आणि वडील भगवतीप्रसाद यांचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या अगदीच सामान्य, किंवा खरंतर गरीबच होते. परिस्थितीचे लागोपाठ आघात दीनदयाळ वर झाले. तीन वर्षांचा असताना, त्याच्या वडीलांचे अचानक निधन झाले. या धक्क्यामुळे आईची तब्येतही बिघडत गेली. क्षयरोग होऊन चार वर्षानंतर आईचेही निधन झाले. त्यानंतर दीनदयाळ यांचे संगोपन मामा राधारमण यांनी करून दीनदयाळ च्या शालेय शिक्षणाकडे लक्ष दिले. परंतु याच दरम्यान त्यांचा अतिशय प्रिय लहान भाऊ शिवदयाळ याचा टायफाईड ने मृत्यू झाला. इतकी प्रतिकूलता असूनही, इतक्या मृत्यूंचे धक्के पचवून दीनदयाळ अभ्यास करत होता. आजच्या सारख्या सुविधा त्या काळात नव्हत्या. सोबतच मामाचे उत्पन्नही साधारणच होते. त्यामुळे दीनदयाळ ला त्याच्यासोबत शिकणाऱ्या मामाच्या मुलाच्या पुस्तकांवर रात्रीच्या वेळी अभ्यास करावा लागत असे. पण याची तक्रार, किंवा कोणतेही भांडवल न करता दीनदयाळ मन लावून आपला अभ्यास करत होता. त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे आणि प्रचंड परिश्रमामुळे त्या काळाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत तो शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. गणित हा त्याचा आवडता विषय होता. त्यातील भूमितीची दीनदयाळ ची उत्तर पत्रिका आदर्श उत्तरपत्रिका म्हणून अजमेर बोर्डात जपून ठेवण्यात आली होती.
या दरम्यानचा एक प्रसंग दीनदयाळजींची विचार करण्याची पद्धत प्रकर्षाने दाखवून देतो. सिकरच्या राजांना या हुशार विद्यार्थ्याची माहिती मिळाली. त्यांनी दीनदयाळ ला दरबारात बोलवून त्याचे कौतुक करत विचारले, " बक्षीस म्हणून तुला काय देऊ?" महाराजांना आश्चर्यचकित करणारे उत्तर मिळाले, "मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या." महाराजांचे आशीर्वाद तर मिळालेच, सोबत एक सुवर्णपदक आणि पुढच्या अभ्यासासाठी विद्यावेतन प्राप्त झाले. पुढील सर्व शिक्षण हे साधारणतः शिष्यवृत्ती वरच दीनदयाळांनी पूर्ण केले.
सर्व मित्र दीनदयाळ -
दीनदयाळ हे स्वतः केवळ हुशार होते एवढेच नाही, तर शालेय जीवनापासूनच ते इतर विद्यार्थ्यांनाही अभ्यासात मदत करत. महाविद्यालयात तर त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण मंडळ तयार केले, ज्याचे नाव 'शून्य मंडळ' असे ठेवले. अनेक अनुत्तीर्ण झालेल्या किंवा अनुत्तीर्ण होण्याची भीती असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे इंटरच्या परीक्षेत उत्तीर्ण होता आले. त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कामही या शून्य मंडळाने केले. इतरांना मदत करून सुद्धा इंटरच्या परीक्षेत दीनदयाळ सर्वाधिक गुणांचा विक्रम करत प्रथम क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकले. त्या पिलानी संस्थेचे प्रमुख, आघाडीचे उद्योजक घनश्यामदास बिर्ला यांनी त्यांना सुवर्णपदक प्रदान केले. सोबतच त्यांच्या संस्थेत एक चांगली नोकरी देऊ केली. परंतु पुढील शिक्षण घेण्याचा विचार पक्का असल्यामुळे, अतिशय नम्रपणे दीनदयाळजींनी ती संधी नाकारली. त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पुढे त्यांनी अविवाहित राहून संपूर्ण जीवन संघ कार्य आणि समाजासाठी व्यतीत केले.
एकात्म मानव दर्शन -
भारतीय चिंतनातून अभ्यासपूर्वक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाची मांडणी केली. हे त्यांचे विचारवंत म्हणून दीर्घ काळ टिकणारे आणि आजही भारत आणि मानवतेला उपयोगी ठरेल असे योगदान आहे. 'एकात्म' हा शब्द दीनदयाळजींचे द्रष्टेपण दाखवते. एकात्म भावात जीवनाचे ऐक्य, तादात्म्य, समरसता, सामंजस्य, परस्पर पूरकता हे सगळे भाव समाविष्ट होतात. व्यक्ती, समाज आणि निसर्ग तिघेही परस्परानुकूल आहेत. परंतु केवळ व्यक्तीकेंद्रित विचार केल्यामुळे पश्चिमेत, पाश्चात्य देशांमध्ये आदर्शांचा संघर्ष झाला. आमच्या समाजात परस्पर संघर्ष नाही तर सहयोगाची शिकवण देण्यात आलेली आहे. ती अंगीकारून आम्ही संपूर्ण मानव जातीला आणि या पृथ्वीला सुखी करू शकतो.
१९६५ च्या दरम्यान साम्यवादी तत्त्वज्ञानाचे आकर्षण जगभरामध्ये होते. भांडवलशाहीचे दोष समोर आणून आणि त्यांचा विरोध करून जगभरातील कामगार वर्गाला एकत्रित करण्याची घोषणा साम्यवादाने केली.
परंतु त्यामुळे जगभरातील मनुष्यमात्र एक आहे, या महत्त्वाच्या तत्त्वाच्या विरोधात आणि एक प्रकारे फुटीर चळवळ कम्युनिझमने सुरू केली.
व्यक्तीला केवळ अन्न, वस्त्र, निवारा मिळाल्याने किंवा कृत्रिम समानता राज्य व्यवस्थेच्या बळाने निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु थोड्याच वर्षात व्यक्तीचे समाधान आणि प्रगतीची प्रेरणा कमी झाल्याचेही त्यांना लक्षात आले. याबाबत तसेच साम्यवादी देशातील समाज जीवनाबाबत अतिशय परखड मत दीनदयाळजींनी व्यक्त केले आहे.
" साम्यवादी देशातील समाज जीवनाचा विचार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील त्या देशांचे व्यवहार कसे आहेत हेही पाहण्यासारखे आहे. रशिया व चीन यांच्यामध्ये साम्यवादाचे वास्तविक स्वरूप व त्यांची वाटचाल या प्रश्नावरून तात्विक मतभेद असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाटचालीची दोघांचीही दिशा एकाच प्रकारची आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर दोघेही कट्टर साम्राज्यवादी आहेत. पंचशील च्या घोषणा करीत चीन संपूर्ण तिबेट आणि भारताचा बराच भू भाग गिळंकृत करून बसलेला आहे, तर रशियाचे रणगाडे पोलंड, हंगेरी मधील आपली कामगिरी (!) उरकून आता त्यांनी अफगाणिस्तानात आपली मोर्चेबंदी केली आहे." ( पं. दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन खंड दोन ,पृ.१८४-८५)
आपण सध्या २१ व्या शतकात देखील चीन आणि रशियाची साम्राज्यवादी भूमिका पहात आहोत. त्यामुळे 'जगभरातील मजूर एक' असे सूत्र अगदी दूर दूर पर्यंत कुठेही साम्यवादात आपल्याला पहावयास मिळत नाही. भांडवलशाहीच्या मार्गावर चाललेल्या अमेरिकेची जगातील अवास्तव दादागिरी सुद्धा आपण पहात आहोत.
१९६५ या वर्षात दीनदयाळजींनी या सर्व स्थितीचा विचार करून आपले तत्त्वज्ञान थोडक्यात मांडले. त्या मांडणीला आता साठ वर्ष पूर्ण झाले असून त्याबाबत या हिरक महोत्सवात विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत.
भारतीय आणि पाश्चात्य विचारातील फरक
पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये मानवी शरीर, मन आणि बुद्धी याचाच विचार शेकडो वर्ष केला गेला. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मनुष्य म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि महत्त्वाचे म्हणजे आत्मा अशा चार घटकांचे संतुलित अस्तित्व मानले गेले आहे. या आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी भारतीय विचारांबद्दल जगात वेळोवेळी अविश्वास दाखवण्यात आलेला आहे, तसेच त्यावर टीकाही केली गेली आहे. परंतु विश्व आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO)
माणूस नावाच्या अस्तित्वाच्या व्याख्येत फिजिओलॉजी कली, सायकॉलॉजीकली, इंटेलेक्चुअली आणि स्पिरिच्युअली आकाराला येणारे अस्तित्व म्हणजे माणूस , असा उल्लेख केला आहे. यामधील Spirituality म्हणजेच अध्यात्मिकता ही कुठेतरी आत्म्याच्या अस्तित्वाच्या दिशेने जाते.
पाश्चात्य विचार पद्धतीत व्यक्ती केंद्रबिंदू आहे आणि मग परिवार, समाज, देश, विश्व अशी रचना दिसते. परंतु यातील सर्व वर्तुळे स्वतंत्र आहेत. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विविधतेला स्वीकारले असून विविधतेतून एकतेकडे जाण्याचा प्रयत्न महत्त्वाचा मानला गेला आहे. ही विविधता व्यक्तीप्रमाणेच कुटुंब, समाज, राष्ट्र किंवा देश यामध्ये सुद्धा असते. असे असले तरी व्यक्ती ते परमेष्टी पर्यंत सर्व घटक मंडलाकार रचनेमध्ये एकमेकांशी जोडलेले आहेत, असे नक्की लक्षात येते. किंबहुना कुटुंबाचा एक घटक व्यक्ती हे सर्वात छोटे आणि परमेष्टी हे सर्वात व्यापक असे प्रगतीचे मापक मानले गेले आहे. आणि म्हणूनच प्राचीन काळापासून एका संस्कृत श्लोकाप्रमाणे व्यक्तीने कुटुंबासाठी, कुटुंबाने गावासाठी, गावाने राज्यासाठी(देशासाठी) आणि राज्याने विश्वासाठी अर्थात विश्व कल्याणासाठी त्याग करावा अशी अपेक्षा आणि मान्यता भारतामध्ये आहे.
१९६५ च्या मुंबई भाषणमालेचा समारोप करताना पंडित दीनदयाळजींनी जवळजवळ हेच विचार पुढील शब्दात व्यक्त केले . ते म्हणाले होते :-
" गेल्या चार दिवसात आपण मानवतेचा समग्र व संकलित स्वरूपात विचार केला. आपण हे तात्विक विवेचन केले. आपण राष्ट्राला बलशाली, समृद्ध व सुखी बनविण्याचा संकल्प केला आहे, म्हणून या वैचारिक अधिष्ठानावर आपल्याला राष्ट्र पुनर्रचनेचे कार्य करावयाचे आहे. आपण आपल्या प्राचीन संस्कृतीचा विचार केला, परंतु आपल्याला काही एखाद्या पुरातत्व संग्रहालयाचे पहारेकरी बनावयाचे नाही. आपले ध्येय संस्कृतीचे रक्षण करणे एवढेच नसून, तिला गती देऊन कार्यक्षम बनविणे हे आहे. आपल्याला असा भारत उभा करावयाचा आहे की जो आपल्या पूर्वजांच्या भारताहून अधिक गौरवशाली असेल आणि येथे जन्मलेला प्रत्येक मनुष्य स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करीत केवळ सबंध मानव जातीशीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीबरोबर एकात्मतेचा साक्षात्कार करीत नराचा नारायण बनण्यास समर्थ होईल."
भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अंत्योदयासाठी म्हणजेच अंतिम व्यक्तीच्या प्रगतीसाठी 'हर हाथ को काम हर खेत को पानी' आवश्यक असल्याचे दीनदयाळजींनी वारंवार सांगितले होते. त्यामुळेच रोजगार मेळावे, विविध कृषी विकास योजना यांना वर्तमान सरकारने दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव दिले आहे. सामाजिक स्तरावरही याच विचारांच्या आधारावर काही प्रकल्प अनेक वर्षांपासून सुरू आहेत. यामध्ये भर पडणे, तसेच समाजातील सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांनी दीनदयाळजींच्या विचारांवर अधिक जोमाने काम केल्यास देशात प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने सार्थक प्रगती होईल, हे निश्चित.
प्रा.डाॅ. केदार ठोसर
'पूर्वरंग', दीनदयाल नगर,
चिखली. जि. बुलढाणा
8668766537






0 Comments