बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे घवघवीत यश विधिमंडळ पक्षनेते आ. वडेट्टीवारांमुळेच – काँग्रेस शहराध्यक्ष करीमभाई
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : एकीकडे देशात व राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपचे दिग्गज नेते आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह १७ नगरसेवक निवडून आणण्यात जे घवघवीत यश संपादन केले व शहराच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले या दणदणीत विजयाचे श्रेय पूर्णतः विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या सक्षम व जनतेशी नाळ जुळवणाऱ्या नेतृत्वाला जाते, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे शहराध्यक्ष करीमभाई यांनी केले आहे.
निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यश प्राप्तीनंतर बोलताना करीमभाई म्हणाले की, “आ. विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक प्रचारात बल्लारपूरच्या प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष संपर्क साधत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, रोजगार यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकत काँग्रेसला भरघोस पाठिंबा दिला.”
भाजपच्या अपयशी व भ्रष्ट कारभाराला जनतेने या निवडणुकीत स्पष्ट नकार दिला असून काँग्रेसच्या विकासाभिमुख धोरणांना कौल दिल्याचे करीमभाई यांनी सांगितले. “नगर परिषद ही सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असते, हे काँग्रेसने कृतीतून दाखवून दिले आहे. आ. वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आणि त्याचेच हे यश आहे,” असेही ते म्हणाले.
या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी संघटितपणे प्रचार करत घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका मांडली. कार्यकर्त्यांची मेहनत, शहर नेतृत्वाची एकजूट आणि आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रभावी नेतृत्व यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या विजयामुळे बल्लारपूर नगर परिषदेत काँग्रेसची भक्कम सत्ता स्थापन झाली असून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास करीमभाई यांनी व्यक्त केला. “जनतेने दिलेला विश्वास आम्ही विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू. बल्लारपूरला स्वच्छ, सुंदर आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
एकूणच बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे घवघवीत यश हे आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाची ठोस पावती ठरली असून शहरातील राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.






0 Comments