चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्याचे २७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर
◾आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश
◾आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगाम २०२४-२५ दरम्यान विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्याची थकबाकी असलेली रक्कम शासनाने मंजूर केली आहे. तब्बल ₹२७,५२,६०,३८९/- निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहे.
आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री श्री. फडणवीस व वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. ओ.पी. गुप्ता यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागणीवर ठाम भूमिका मांडली होती. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री व वित्त विभागाने तात्काळ निर्णय घेतला. परिणामी धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेवर मिळणार असून खरीप हंगामाचे नियोजन करताना मोठा दिलासा मिळणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ४३ धान खरेदी केंद्रांमार्फत ५१४५ शेतकऱ्यांकडून २,०९,७४४.६२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. मात्र, थकबाकी न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले होते. आता मंजूर निधीमुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या हाती पोहोचणार असून खरीप हंगामातील गरजेच्या खते, बियाणे व मजुरी यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.
‘शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणे ही केवळ माझी जबाबदारी नसून माझे कर्तव्य आहे. धान चुकाऱ्याचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, याचा मला आत्मिक समाधान व आनंद आहे,’ अश्या भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
0 Comments