जिल्हाधिकाऱ्यांकडून ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रकल्पांची पाहणी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्यूज ) : जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज ब्रम्हपुरी तालुक्याचा दौरा करत विविध महत्वाच्या विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये पावसाळ्यात अडथळा निर्माण करणाऱ्या पुलांचे अपूर्ण काम, आरोग्य सेवा केंद्र, सौर ऊर्जा व जलशुद्धीकरण प्रकल्पांचा समावेश होता.
दौर्याच्या प्रारंभी अड्याळ गावगन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत पावसाळ्यात पसरू शकणाऱ्या रोगांवर उपाययोजना करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर त्यांनी भुती नाल्यावरील अपूर्ण पुलाचे काम, ब्रम्हपुरी शहरालगत असलेल्या नॅशनल हायवेजवळील पूल, लाडज व तपाळ येथील पूल व सौर ऊर्जा प्रकल्पांची पाहणी केली. विशेषतः वडसा रोडवरील भुती नाल्यावरील पुलाचे अपूर्ण काम नागरिक व विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत असल्याने संबंधित विभाग व कंत्राटदारांना काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
आरमोरी रोडवरील रेल्वे पुलाच्या अपूर्णतेमुळे रेल्वे फाटक बंद झाल्यास वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा आदेशही त्यांनी दिला. लाडज गावातील पूल अपूर्ण असल्यामुळे मुसळधार पावसात गावाचा संपर्क तुटतो व नागरिकांना स्थलांतर करावे लागते. यामुळे लाडज पूल लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या ठिकाणी सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना सांडपाणी व्यवस्थापनाबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. तपाळ येथे उभारण्यात आलेल्या उर्जा आधारित जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट देत त्यांनी त्याची सविस्तर पाहणी केली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या व संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.
या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार श्री. मासळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, नगर परिषद मुख्याधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी व ब्रम्हपुरी पोलीस निरीक्षक यांची उपस्थिती होती.
0 Comments